१)आजचा युवक: दशा आणि  दिशा

​​         लेखक: शुभम केशव जाधव

             विश्वातल्या सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात 135 कोटी जनता एकमेकांच्या हातात हात गुंफून गुण्यागोविंदाने नांदते. ह्या 135 कोटीतील जवळपास 35%  युवक असलेला भारत हा युवकांचा देश! गावातल्या पारापासून ते मंत्रालयाच्या कक्षांपर्यंत सर्वत्र आपली भूमिका बजावणारा हा तरुणवर्ग.
सर्वांगीण विचार केला तर भारतातील युवक हा पूर्णपणे दिशावानही नाही आणि दशावानही नाही परंतु आजच्या बेरोजगारीच्या संकटात नक्कीच कुठेतरी भरकटलाय असं म्हणायला हरकत नाही. बघता बघता 9% वर पोहोचलेल्या बेरोजगारीच्या दराने नक्कीच युवकवर्गाला ग्रासलेय.त्यातच पालकांच्या, कुटुंबाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि सामाजिक तणाव यांच्यामध्ये  तरुण गुरफटलेला दिसतो. ह्याच वर्णन करताना ‘आर. माधवन’ चा ‘थ्री इडियट्स’ मधला संवाद प्रकर्षाने आठवतो-“लाईफ एक रेस है| अगर तेज नहीं भागोगे तो कोई तुम्हे कुचलकर आगे निकल जाएगा| हम सब तो कॉलेज सिर्फ डिग्री पाने के लिए जाते थे| डिग्री नहीं होगी तो नोकरी नहीं होगी, नोकरी नहीं होगी तो कोई बाप अपनी बेटी नहीं देगा, बँक क्रेडिट कार्ड नहीं देगी, दुनिया रिस्पेक्ट नहीं देगी|” अशी काहीशी आजच्या तरुणाईची अवस्था!

एकंदरीत समाजाच्या विविध स्तरांवर तरुणांच्या समस्या काही अंशी बदलतात. गावे स्वयंपूर्ण नसल्याने गावाकडील तरुण वर्ग शहराकडे रोजगाराच्या संधी शोधतो. शेतकऱ्याची तरुण मुले शेतातील उत्पन्नाची अनिश्चितता, पावसाचा लहरीपणा यामुळे रोजगारासाठी सरळ शहराकडे धाव घेतात. या सर्वांचा परिणाम शहरांवर होतो आणि त्यांवर नाहक तणाव निर्माण होतो. शिक्षण आणि रोजगार यासाठी तरुण शहरालाच प्रथम प्राधान्य देतात आणि एकूणच गाव आणि शहर यांतील समतोल ढासळतो. पुणे- मुंबई सारख्या शहरांत तरूणांची रेलचेल पाहायला मिळते. ह्या सर्व दिशावान आणि दशावान तरुणांना शहरे योग्य प्रमाणात मार्गदर्शक ठरतात की नाही हा मुद्दा जर बाजूला ठेवला तर तरुणवर्ग कुठेनकुठे समाजात आपली ओळख निर्माण करण्यासाठी झगडतोय हे नक्की! उच्च, मध्यम आणि कनिष्ठ वर्गातल्या तरुणांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत पण ऐन तारुण्यात शरीरात घडणारे बदल आणि त्याचबरोबर या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जर निर्णय कुठे चुकला किंवा तो अपयशी झाला तर हीच तरणीबाण पोरं नैरश्यानं ग्रासतात आणि मग नैराश्य व्यसनांना जवळ करते आणि व्यसन विनाशाला!

आजकालच्या युगातील तरुण पिढीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ‘सोशल मीडिया’ म्हणजेच ‘समाज माध्यमे’.  फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप अश्या अगणित समाज माध्यमांमध्ये तरुण अडकून बसलेला दिसतो. अंततः या सर्वांचे फायदेही आहेत आणि तोटेही आणि माझ्या मते सोशल मीडिया आणि इंटरनेटनी जग जवळ आले आहे हे नक्की! तरुणांमधील स्मार्टपणा ह्या माध्यमांमधून वेळोवेळी रिफ्लेक्ट होतो आणि ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. पण सोबतच प्रचंड प्रमाणात वाढलेले ‘सायबर गुन्हे’ आणि सोशल मीडिया चा अनाठायी वापर यांवरुन तरुणवर्ग हा ह्या सर्वांच्या आहारी गेलाय हे ठळकपणे निदर्शनास येते. आणि जे दिसते त्यावरूनच समाजात मतप्रवाह बनतात हे मान्य करायलाच हवे.

ऐन तारुण्यात काहीही करण्याची धमक असते. ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ असे तारुण्यावस्थेचे वर्णन आपण करतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार करता प्रभू रामचंद्रांनी घालून दिलेला आदर्श ते छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या विश्वाला त्यांच्या तारुण्यातून घालून दिलेली प्रेरणा आदर्श आहे. अवघ्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जगाला दिली, तारुण्याच्या उंबरठ्यावर ‘हर हर महादेव’ गर्जना करून आपल्या सवंगडयासोबत महाराजांनी शिवसाक्षीने घेतलेली प्रतिज्ञा असा तरुणाईचा इतिहास आपल्याला लाभला हे विसरून कसं चालेल? ‘सक्सेस’ मंत्राचा शोध तरुण घेताना दिसतो पण सुभाषचंद्र बोसही अशाच मंत्रासाठी ऐन तारुण्यात आपल्या सहकार्यांना घेऊन एका गुरूच्या शोधासाठी निघाले. दूर एका पर्वतात भेटलेल्या गुरूने केलेला उपदेश आपल्या तरुणाईला उद्बोधक आहे. ते नेताजींना म्हणाले-‘अरे वेड्या, मूलमंत्र काय शोधतोस? सुभाष, तुझ्या 38 कोटी जनतेवर जुलूम करणाऱ्या या ब्रिटिश बांडगुळाला नामशेष करणे हेच तुझे लक्ष्य आणि देशासाठी लढणे हाच तुझा मूलमंत्र!’

नुकत्याच महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यातही मा. रोहित पवार, मा. आदित्य ठाकरे, मा. आदिती तटकरे, मा. झिशान सिद्दीकी यांसारख्या तरुणांनी बाजी मारली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तारुण्यापर्व पाहायला मिळाले. अवघ्या 21 वर्षीय हिमा दासने आंतरराष्ट्रीय स्तरावर मारलेली बाजी तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनली. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची शान वाढवली. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. भावार्थ असा की भारतातील तरुण प्रयत्न करतोय, धडपडतोय, पुन्हा उठतोय आणि स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाला, गावाला, देशाला, मोठं करतोय.

अब्राहम लिंकन म्हणालेच होते की ‘तुमच्या देशाच्या तरूणांच्या ओठांवरच गीत सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो.’ म्हणजेच तरुणांचा विचार हा देश घडवतोही आणि बिघडवतोही.

सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता तरुण नाहक मारला जातोय हेही तितकेच खरे आहे. निवडणुकीच्या काळात नेते तरुण पिढीला हाताशी धरतात. प्रचारामध्ये महत्त्वपूर्ण वाटा तरुणवर्ग उचलतो आणि ह्याच तरुणांच्या खांद्यावर चढून हे नेते आमदार-खासदार होतात. पण तरुण कार्यकर्ता हा शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच राहतो. त्याच निवडणुकीच्या धामधुमीत व्यसनाधीन होतो. निवडणूक निघून जाते पण व्यसन काय साथ सोडत नाही. नुकत्याच दिल्लीत झालेल्या CAA आणि NRC विरोधातील दंगलीत दिल्ली सुरक्षा यंत्रणेवर गोळीबार करणारा शाहरुख पाहिला की अंतर्मुख होण्याची वेळ येते. कुठल्याही गोष्टीवर प्रभावित होऊन अपायकारक पावलं उचलणारी ही तरुण पिढी कधीकधी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेते.
तरुणांच्या जीवनावर आणखी एक गोष्ट प्रभाव करते आणि ती म्हणजे ‘सिनेमा‘. सिनेमातला नायक अशी काही क्रांती घडवतो, मग तो ‘क्रांतिवीर‘ मधील ‘नाना‘ असो नाहीतर ‘कबीर सिंग‘ मधला ‘शाहिद‘. पण स्वप्न आणि वास्तव यांमध्ये कुठेतरी सिनेमा असतो आणि तिथेच परीक्षण करताना तरुण चुकतो. तरुणांनी सिनेमा पाहतानाची दृष्टी ही चौफेर आणि सर्वसमावेशक ठेवावी ज्यामुळे योग्य त्या गोष्टी स्वीकारल्या जातील हे माझे प्रामाणिक मत आहे.

तरुणाईतील व्यसनाधीनतेकडे जर बारकाईने पाहिले तर काही तरुण नैराश्यातून व्यसनाकडे ओढले जातात तर काही मजा म्हणून. ‘एक ही लाईफ है…..ट्राय कर….. कुछ नहीं होता’ असं म्हणून मित्रच मित्रांना व्यसनात ओढतात हे काही विवादास्पद नाही. त्यातूनच मुंबई, पुणे आणि इतर शहरांतील क्लबिंग आणि पब संस्कृती पाहिली की खरंच तरुण आयुष्य एकदाच आहे म्हणून मजा करतायेत की स्वतःला व्यसनाच्या खाईत धकलताय हा मुद्दा डोके वर काढतो. रेव्ह पार्ट्यांकडे तरुणाईचे आकर्षण आणि एकूणच पाश्चात्त्य संस्कृतीचे चाललेले अंधाधुंद या अनुकरण नक्कीच चीड येईल असे आहे.

परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि आपल्या नाण्याची दुसरी बाजू अशी की तरुणाईची प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न पाहण्याची जिद्द! आजचे तरुण सैन्यात प्रशासकीय सेवेत, खेळात, राजकारणात, समाजसेवेत, शिक्षणात अशा सर्व स्तरांवर स्वतःची भूमिका चोखपणे पार पाडतायेत. हीच नवी आशावादी पिढी देशाच्या गरुडभरारीसाठी पूरक ठरते. आजच्या तरुणाईत जिज्ञासा हा गुणही प्रकर्षाने जाणवतो. का, कसे, कधी सर्व प्रश्न आजचे तरुण करतात, जिज्ञासूवृत्ती जोपासतात.
‘मन में है विश्वास,
पुरा है विश्वास,
हम होंगे कमियाब एक दिन’
ह्या ओळीप्रमाणे मला विश्वास आहे की आजचा युवक नक्कीच सफल, उज्ज्वल आणि महत्वाकांक्षी वाटचालीकडे झेप घेईल. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील.
‘कुछ पानेकींहो आस आस
कुछ अरमॉं हो जो खास खास
हर कोशीश मेंहो वार वार
करे दरियाओंको आर पार’
अंततः युवकच आहे आपल्या राष्ट्राचा भूत, भविष्य आणि वर्तमान!

2)थोडे तरुणांच्या मनातले!

        ​लेखक: कुलदीप भानुदास देशमुख

आपल्या देशाचे लाडके माजी राष्ट्रपती होऊन गेलेल्या श्री .ए.पी.जे .अब्दुल कलामांनी पाहिलेले स्वप्न म्हणजे जगाच्या पाठीवर महासत्ता झालेला आपला देश .पण आज बहुतांशी तरुणवर्ग डिप्रेशन ,नैराश्य ,ह्याने त्रस्त आहे .तस पाहायला गेलं तर ह्या जगात सुखी कोणीच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेत ,वेगळी tragedy आहे .पण बरेच तरुण निराशा,दुःख पचवता येत नाही म्हणून मरणाचा मार्ग अवलंबताना दिसतायत .मग कसा होईल आपला देश महासत्ता अशाने?कोणी फास लावून घेत ,तर कोणी हाताची नस कापून घेत आणि आणखी बऱ्याच पद्धतीने स्वतःचा जीव घेतात .

जसे मरणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच जगण्यासाठीही अजून भरपूर पर्याय आयुष्यात आहे हे त्यांना का समजत नाही ह्याच मला आश्चर्य वाटते.

सध्या social media ,वृत्तपत्रे ,दुरचित्रवाहिन्या ह्या सगळीकडे नैराश्य (डिप्रेशन,mental health ) ह्या वर विशेष प्रकाश टाकला जातोय …त्याच कारण म्हणजे अलीकडे एक सुप्रसिद्ध गुणवान नवोदित कलाकाराने नैराश्याला कंटाळून केलेली आत्महत्त्या .खरेतर प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन नाव ,पैसा ,लोकप्रियता हे सर्व काही त्या अभिनेत्याच्या* पायाशी लोळण घालत होत…तरीदेखील त्याने आपली जीवनयात्रा का संपवली असावी असा मनात प्रश्न उभा राहतो . आजकाल देशातील आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना बघायला मिळतेय . ह्या आत्महत्या करणाऱ्यानमध्ये प्रामुख्याने तरुण युवक तसेच युवतींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे …आणि ही चिंता वाढवणारी बाब पचवताना मन नक्कीच कचरते .अपयश आल्यानंतर नक्की तरुणांनी काय करायला हवं त्या अपयशाला सामोरे कसे जायचे तेव्हा छिछोरे(Chhichhore) ह्या हिंदी चित्रपटातील डायलॉग मागील तीव्रता नक्कीच जाणवत राहते.

“सक्सेस के बाद का प्लॅन सबके पास है

लेकीन अगर गलती से फेल हो गये

तोह फेल्युअर्स से कैसे डील करना है

कोई बात ही नहीं करना चाहता “


मनुष्य योनीत जन्म घ्यायला फार मोठे भाग्य लागते असे म्हणतात ना आपल्यात ..तरीदेखील एवढ्या सुंदर आयुष्याचा असा हृदयद्रावक शेवट का करतात ही मुलं मुली …हे कोडं अजूनही सुटलेलं नाहीय !

बाळ गर्भावस्थेत आईच्या पोटात वाढत असताना ती माय,माऊली रक्ताचं पाणी करून मोठ्या कष्टाने ,धीराने सांभाळ करून वाढवते आणि आपल्याच काही मित्र ,मैत्रिणी स्वतःला अगदी सहजासहजी संपवतात

मायभाषेतली एक खूप सुंदर अशी कविता आहे त्यातील काही ओळी नक्कीच आठवतात

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा
आपला देश हा तरुणांचा देश आहे पण खरोखरच आजचा तरुण कणखर ,राकट आहे का हा प्रश्न तुम्ही नक्कीच स्वतःला विचारला पाहिजे .

आपल्या स्वराज्याचे निर्माते शिवाजी महाराजांच्या काळात एखाद्या युवकाने नैराश्याला कंटाळून आत्महत्या केलीय अस कधी ऐकलय का ,किंवा अस कुठे वाचलंय का ..नाही ना .त्याकाळी देखील असतील ना जीवनात नाना अडचणी तरीदेखील नैराश्य हे अस्तित्वात पण नव्हते. ह्याचे कारण म्हणजे पूर्वीचा काळ खूप हलाखीचा जरूर होता पण कुटुंबातील प्रत्येकजण कष्ट करत होता एकमेकांच्या सुख दुःख जाणून घेणारी जिवाभावाची माणसे होती.कदाचित म्हणूनच की काय त्याकाळी तरुण वर्ग कठीण परिस्थितीत देखील तग धरून राहिला .आजचा जमाना सर्व काही इन्स्टंटचा आहे .पिझ्झा आणि बर्गर अगदी काही मिनिटात घरपोच मिळवण्यात आपला तरुण वर्ग धन्यता मानतो .खरे बघायला गेलं तर सगळं लगेचच मिळाल्यामुळे आपल्यातली संयमी वृत्ती,सहनशक्ती हरवत चालली आहे .त्यामुळे सगळ्यांमध्ये इगो वाढत चाललाय .

लहानपणी घरी एखादी गोष्ट मागितल्यावर जसे घरचे म्हणायचे बघू,घेऊ ,थांब जरा ह्यातली मजा ,त्या गोष्टीसाठी वाट पाहताना होणारी मनाची घालमेल ,नंतर ती गोष्ट मिळाल्यानंतर चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आपण कधीच विसरलोय .तो आनंद आपण ऑनलाईन मागवलेली वस्तू लवकर मिळूनदेखील मिळत नाही.
आज अनेक तरुण काही इच्छा,आकांक्षा ,स्वप्न उराशी बाळगतात ,त्या स्वप्नाचा पाठलाग करताना जर का अपयश आले तर लगेचच खचून जातात .समाज काय म्हणेल ,घरचे काय म्हणतील ,मित्रांमध्ये आता कस राहू ह्यांसारख्या अतिशय क्षुल्लक अवस्थेत अडकून राहतात आणि स्वतःला संपवण्याचा मार्ग निवडतात .
मग ह्या त्यांच्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण पालक ,समाज का व्यक्तिगत ते स्वतः ?तर ह्याला तुम्ही आम्ही सर्व कुठं न कुठे जबाबदार आहोत .

पालकांच्या अपेक्षांचं ओझं पेलवता पेलवता मुलं स्वतःच्या आवडीनिवडींचा त्याग करतात आणि तसच कुढत कुढत एकेदिवशी मरणाला कवटाळतात . निराश असलेल्या मुलाच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर त्याच्या मनाची दारे उघडण्यासाठी विचारपूस करायची सोडून त्याने दरवाजा बंद का केला ह्यावरून संतापणारे बहुतांश पालक आपण बघतो .
जिगरी दोस्त ,मित्र हे देखील मित्र जर चालता चालता पडला तर त्याला मदतीचा हात देण्याऐवजी प्रथमतः त्यावर हसतात आणि मग त्याला उठवण्यासाठी हात सरसावतात .हे कोठेतरी थांबल पाहिजे .
लहानपणापासून आपल्या मनावर एक गोष्ट कायम बिंबवली गेली ती म्हणजे जर चांगल शिक्षण घेतलं ,तर चांगली नोकरी मग लग्नासाठी छोकरी मिळेल आणि आपलं आयुष्यातून दुःख कायमच निघून जाईल पन आपल्याला हवं तसं आयुष्य आनंदात जगण्याची मुभा फार कमी पालक देतात.आयुष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी रिस्क घेणारी मुलं,मुली त्यामुळेच खुप कमी दिसतात .पालकांनो खर म्हणजे आपल्या पाल्याच चांगले करिअर घडवण्यापेक्षा त्याला /तिला आधी उत्कृष्ट माणूस म्हणून घडवणं महत्वाचे आहे. बदलणाऱ्या जगाशी स्पर्धा करता करता ही मुलं ,मुली कधी स्वतः च्या जीवाशी स्पर्धा करायला लागतात हे त्यानाही कळत नाही .निराशेच्या गर्तेत अडकलेली ही युवा पिढी एरव्ही

Living my life to the fullest ,

my life ,my rules

अशी स्टेटस ठेऊन आपलं दुःख लपवतात नाहीतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामच्या हॅशटॅग ,इमोजी ह्याचा आधार घेत असतात .
तेच जर त्यांनी तर थोडी हिंमत दाखवून मनमोकळेपणाने मनातल्या ,दुःख ,शंका आई वडील,मित्र ,मैत्रीण आपले प्रियजनासमोर मांडले तर निश्चितच नैराश्यावर मात करता येऊ शकते.आत्महत्या करणे हा त्यावरचा उपाय मात्र नक्कीच नाही .

डिप्रेशन येणं म्हणजे काही चुकीची बाब नाहीय जर आयुष्यात निराश नाही झालात तुम्ही तर तुम्हाला नव्याने पेटून ,मोठ्या जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा कसे काय येईल . जीवनात प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे हे ध्यानात घेऊन आपल्याला आवडत असणाऱ्या कामातून व्यक्त झालात तर हा आपला युवा नक्कीच समृद्ध होईल ,आणि गौरवशाली देशाकडे आपली वाटचाल अधिक वेगाने होईल.


मग तुम्हाला कोणत्याही मानसोपचार तज्ञाची ,समुपदेशकाची गरज उरणार नाही ह्याची मला निश्चितच खात्री वाटते.एखाद्या तरुणाने ,तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर हळहळ करत बसण्यापेक्षा त्याच/तीच मन ,दुःख जाणून घेऊन आधार झालो तर ह्या जगात कुणीही स्वतःला एकटा समजणार नाही .खालील पंक्ती नेहमी आचरणात आणली पाहिजे
एकमेका साहाय्य करू अवघे सुपंथ धरू!
जसे निसर्गाचं ऋतुचक्र नेहमी बदलत असते तसच आयुष्यात सुखाचेही दिवस येतात आणि दुःख ही येते .एक खुप सुंदर अस सकारात्मक वाक्य आहे जे आपण सर्व युवा वर्गाने कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे .
हे ही दिवस निघून जातील!
किती गमतीशीर आहे ना हे वाक्य उलट जरी वाचले तरीही एकच अर्थ होतो.

आज तरुणांना त्यांच्या पालकांनी ,जीवलगांनी इतकं म्हणाले तरी खूप आहे .घरच्यांच पाठबळ आणि आशीर्वाद घेऊन आपली तरुण पिढी संपूर्ण जगावर राज्य करू शकते ह्यात मला तिळमात्रही शंका नाही..

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून ,फक्त लढ म्हणा

​3)आई प्रत्येक दिवस तुझाच!

       लेखक : कुलदीपक  भानुदास  देशमुख

आज मातृदिन आहे सकाळपासून बघतोय प्रत्येकजण आईची महिमा social media वर आपापल्या परीने जगाला दाखवतोय …म्हणलं आपण पण थोडे मनातले लिहुया आईबद्दल एकच दिवस तर लिहायचं आहे …म्हणून हा सगळा खटाटोप
माझ्या मते दिवस सुरू झाल्यापासून आपली आई ही भिंगारीसारखी भिरभिरत दिवसभर काम करायला लागते ..दिवस संपतो पण तिची कामे मात्र काही संपत नाही ..अहो कशी संपणार काम तिची कुठं असतात आपलीच तर कामे असतात .दिवसभरातील घरातील मंडळींची दुःखाची गाऱ्हाणी ,कामामुळे होणारा ताणतणाव हे सगळे बिचारी निमुटपणाने सहन करत घर चालवत असते.
आपली आई देखील एकप्रकारची नोकरीच करत असते फक्त एवढंच की तीला आपल्यासारखी शनिवार रविवारी सुद्धा सुट्टी नसते.आणि जरी असेलच 1-2तास रिकामा वेळ तर तो देखील तिला आवडणाऱ्या गोष्टी न करता ती घरातल्या मुलांची ,नवऱ्याची जिभेचे चोचले पुरवते किंवा मग गॅलरीत,बाल्कनीत बसून गहू निवडत बसते .सर्वात जास्त वेळेचा संपूर्ण योग्य उपयोग जर कोणी करत असेल तर मला वाटते ती म्हणजे आपली आई..
आईच वेळेचं नियोजन एकदम अफलातून असते .
तुमच्या माझ्यासारख्या वय वाढणाऱ्या पोरांवर फक्त स्वतःचे undergarments धुण्याची सुद्धा ती वेळ आणत नाही आणि जर तशी वेळ आलीच तरी पण आपण तिच्यावर ओरडतो ,किंचाळतो
आणि ती बिचारी मात्र शांतपणे आपले ऐकून घेत असते कोणतीही तक्रार न करता .

आईने चुकीचा इंग्रजी शब्द उच्चार केला,मोबाइल व्यवस्थित नाही हाताळला तरी पण लगेच आपण तिला अडाणी आहेस तू ,तुला नाहीच जमणार ते ,कशाला उद्योग करते जमत नाही तर अस म्हणून मोकळे होतो पण हे विसरून जातो की कधी कधी आपण पण अशा चुका केलेल्या असतात त्यामुळे आईला त्रास होऊन सुद्धा ती आपल्या चुकांकडे हसत हसत दुर्लक्ष करत माफ करत असते .

कितीही काही झालं तरी घरातली सगळी काम ही आईनेच करायची असतात असं आपण नेहमी म्हणत असतो ..त्यासाठीच तर आलीय ती घरात ..तिने मग काम केलेच पाहिजे दुसरे काय जमणार आहे तिला ही आपली ठरलेली वाक्य पण जेव्हा आपली आई काही दिवसांसाठी घरी नसते तेव्हा मात्र कळते आईची किंमत . जेव्हा तुमच्या माझ्यासारखी मुले बाहेरगावी शिकायला जातात ,स्वतःची कामे आपण स्वतः करायला शिकतो ,स्वयंपाक करू लागतो तेव्हा जाणीव होती आपल्या आईची की जीच्याविना आपलं जीवन खरेच व्यर्थ आहे..
खरेतर आजच्या दिवशी आईच महत्व त्यांना विचारून बघा ज्यांना आई नाही .रोज त्यांना आपल्यासारखा उठल्यावर रोज बसल्याजागी चहा ,जेवण,आईच्या कुशीतली झोप भेटत नाही .त्यांना सर्व गोष्टी स्वतः करायला लागतात.
ते म्हणतात ना की जो देतो तितकंच तो घेतो पण आईबाबतीत तस होत नाही .तीचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी यश मिळवतो. आपला जीवनभराचा यशस्वी प्रवास हेच तिच्या डोळ्यांतील स्वप्न असते.
आयुष्यभर आई आपल्यावर निर्व्याज प्रेम करत असते एकवेळ मुलांच्या तिच्याकडे असलेल्या अपेक्षा वाढतात पण ती कोणतीही अपेक्षा ठेवत नसते .

प्रत्येक जण आपल्या आईवर प्रेम करत असतो मात्र आईबाबत तितकाच निष्काळजीपना ही आपण दर्शवत असतो कमीत कमी तुमच्या माझ्या वयाची मुले तरी असा निष्काळजी पना करतोय .प्रत्येकाला स्वतः साठी स्पेस हवाय पण स्वतः साठी स्पेस निर्माण करत असताना आपण आपल्या आईचा तिला हवा असणारा स्पेस हिरावून घेतलाय हे मात्र नक्की .
आणि हो आज मातृदिन असून देखील मातृदिनाच्या शुभेच्छा देण्याचा अधिकार आपल्याला नाही कारण ईश्वराने निर्मिती केलेल्या आपल्या आई वरून आपण किती सहजपणे शिव्या देतोय आणि हा कलंक शेवटपर्यंत कायम राहनार ह्यात तिळमात्र ही शंका नाही .
आज social मीडिया मुळे का होईना सर्व जण आपल्या आईची एक औपचारिकता का होईना म्हणून तिच्याबद्दल प्रेम ,कृतज्ञता व्यक्त करतायत ही पण चांगली गोष्ट आहे .असो जगातील सर्व थोर मातांना माझ्याकडून मनपूर्वक मातृदिनाच्या शुभेच्छा

फक्त इतकेच म्हणावसं वाटते …
इस दुनिया मे माँ से बडा योद्धा कोई नही हैं!!

-:NOTICE:-

​सभासदांनी आपले ओळखपत्र आमच्या कार्यालयातून गोळा करावे.

  • Instagram
  • YouTube